काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरुन वाद   

नांदेड : जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी काँग्रेस पक्षाने एकच जिल्हाध्यक्ष नियुक्त करावा, अशी मागणी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे करण्यात आल्यानंतर त्यावरून नांदेड जिल्हा काँग्रेसमधील वाद समोर आला आहे. सध्याची दोन जिल्हाध्यक्षांची रचना कायम ठेवण्याची मागणी राहुल ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खातेही उघडता आले नव्हते. राज्याच्या निर्मितीनंतर पक्षाची अशी गत प्रथमच झाली. निवडणुकीतील दारुण पराभवानंतर या पक्षामध्ये आता गळती सुरू झाली असून, पक्षसंघटना निष्क्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यातच पक्षाचे एक प्रभारी जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी एकच जिल्हाध्यक्ष नेमण्याची मागणी थेट दिल्लीतील नेत्यांकडे केल्यानंतर पक्षातील बी.आर.कदम यांच्या समर्थकांनी त्यास विरोध दर्शविला आहे.

Related Articles